"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

पाऊस (चारोळ्या)


पाऊस (चारोळ्या)

पावसा का तू असा रडवतो 
धरणीचा "बा" इथे वाट बघतो,
यंदा खट्याळ बरसून पिकू दे
फक्त इतकेच मागणे मागतो.

पावसा ये ना रे लवकर 
रुसवे फुगवे विसरून,
शेतकरी बाप बसलाय 
कपाळावर हात ठेवून.

भिजावं तुझ्या संगतीने
ओल्या चिंब पावसात,
गत पाऊस कसा होता 
नाही माझ्या स्मरणात.

श्रावणात बरसून
तन मन धुंद झाले,
मी तुझ्यासवे सख्या 
पावसात चिंब न्हाले.

पीक नाही, पाणी नाही
शेतकरी "बा" पडलाय मरून,
आता तरी ये राजरोस
पाऊस कुठे बसलाय दडून.

कसा आहेस रे पावसा
अजूनही तू रडवतो 
आम्ही मात्र तृष्णा
थोडक्यातच भागवतो.

मिलनात तुझ्या
बरसला पाऊस,
अलगद ओथंबला
गालावरचा टिपूस.

पाऊस असावा असा
तिन्ही सांज जसा,
स्वप्नातही बरसावा
होऊन वेडा पिसा.

पाऊस बरसला धो धो
चहूकडे चिखल सारा,
पावसात भिजतांना मात्र
खट्याळ हसतो वारा.

नेहमी पडावा पाऊस
माझ्या ओल्या अंगणी,
मिठी व्हावी घट्ट अशी
जणू चंद्र अन चांदणी. 

विरहात जगतांना सख्या
डोळ्यांत ओसरला पाऊस,
होईल का मिलन पुन्हा
का, कसे, कुणास ठाऊक ?

पावसात जरा भिजतांना 
अलगद तुझी आठवण,
भिरभिरे हळूच घालतात
पणती भोवती औक्षवण.

विरहाच्या सागरात
मोती तो आठवणींचा,
कळेना का बरसला ?
पाऊस हा वळवाचा.

नाचलो तुझ्या संगतीने
पावसात चिंब होऊन
आठवता क्षण तो
ठेवला मनी जपून.

पाऊस अन चातक
गणित हेच चालायचे,
तृष्णा क्षमविण्या थेंब
वरच्या वरी झेलायचे.

ओसरून गेला आता
पाऊस तो ओलाचिंब,
मनी उमटले तुझे
क्षणोक्षणी प्रतिबिंब.

थेंबा थेंबाचा पाऊस
थकला वाट बघून,
कोरडा घसा जरी हा
मिटवी थेंब झेलून.

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल (नागपूर)
7588691372
kamlesh1029@gmail.com