शिवछत्रपती
जिजामातेच्या उदरातून
जन्मला एक छावा,
उजळल्या दाही दिशा
नाव तयाचे शिवबा
ऐकुनी सदा मातेवदनी
शौर्याच्या कथा न् गाथा,
स्वराज्यासाठी देवीचरणी
टेकला शिवबानी माथा
स्वराज्यासाठी शपथ घेतली
रायरेश्वराच्या गडावर,
विश्वास त्यांचा जनमानसात
भिस्त होती मावळ्यावर
होता सखा वीर तानाजी
स्वराज्याचा सरदार,
सिंहासारखा लढला एकटा
सोसले छातीवरती वार
प्रतापगडावर केला पराक्रम
शिवाबसंगे जीवाची शान,
यमसदनी पाठविला थेट
पायथ्याशी अफजलखान
स्वराज्यासाठी तलवार
चालविली शत्रूवरती,
सैरावैरा पळाले शत्रू
देऊनी हुंकार छत्रपती
जाणता राजा असा जाहला
न भूतो, न भविष्यती,
दिशादिशांतूनी सिंह गर्जला
जय जय श्री शिवछत्रपती
शिवबाचे नाव घेता
छाती गर्वाने स्फुरते,
शिवरायांसम पुत्र व्हावे
या मातीत भारतमाते
© कमलेश सोनकुसळे, काटोल