ठराव
दुःख झेलण्या मज आता सराव पाहिजे
स्वप्न बघण्यास कश्याला ठराव पाहिजे
आनंदाने जगण्याची केली चेष्टा जरा मी
मैत्रीने जगावयाचा मनी भराव पाहिजे
खेळ खेळून झाले कैक जीवन मरणाचे
मरणाला मिठीत घेण्या इथे हाव पाहिजे
असू दे अंगावर कितीही फाटके कपडे
सलाम ठोकण्या ज्ञानाचा पेहराव पाहिजे
जीवन जगून झाले अन् हरलो जरी मी
अर्ध्यावरती जिंकण्या इथे डाव पाहिजे
हरवलो जरी काळोख्या रात्री कैकदा मी
तुझ्या आठवणींचा समोर गाव पाहिजे
रंग लाव तुला हवा तेथे कुठल्याही क्षणी
हृदय रंगण्या आधी त्याला घाव पाहिजे
तू कष्ट कर आणि पिकव शेती कितीही
शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव पाहिजे
उलगडले शब्द लिहिण्या लेखणीला जरी
कागदावर चालण्या तिला ठाव पाहिजे
© कमलेश सोनकुसळे, काटोल