
टिपूर चांदणं
मला अजूनही आठवतंय...
आपलं एकांतात बसून
तासनं तास गप्पा मारणं,
प्रितिकलह करून जणू
क्षणार्धात मलाच तारणं,
प्रितीच्या गाभाऱ्यात तुझं
टिपूर चांदणं शोधणं.
मला अजूनही आठवतंय...
छोट्या छोट्या गोष्टींवर
नेहमी पैज लावणं,
तू स्वतः जिंकून सुद्धा
हरल्यासारखं वागणं,
ओथंबणाऱ्या नयनांनी तुझं
टिपूर चांदणं शोधणं.
मला अजूनही आठवतंय...
तुझं चोरपावलांनी
अवेळी भेटायला येणं
वळवाच्या पावसानं जसं
धरणीवर हजेरी लावणं,
हिरव्या गवतावर तुझं
टिपूर चांदणं शोधणं.
मला अजूनही आठवतंय...
आपलं लपून छपून
एरवी एकांतात भेटणं,
स्वप्न रंगवीत आसमंतात
अबोल भावनांना पाठवणं,
मन पाखरू होऊन तुझं
टिपूर चांदणं शोधणं.
मला अजूनही आठवतंय...
प्रणयक्षणी नेहमीचच
तुझं हात झटकणं,
विसंगतीच्या अदेमध्ये
अलगद माझं बहकणं,
बाहुपाशात शिरून तुझं
टिपूर चांदणं शोधणं.
... आठवतंय तुला ?
आठवत असेल... नसेलही....
मला मात्र...
तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण आठवतो.
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com