अंतरातील भीती
वाळूचा असे त्रागा तुझ्यातून मी सरकले असावे
ओंजळीतून क्षण आता असे निसटले असावे
जगाचा तसाही नेहमीचाच आरोप माझ्यावर
तुला बघुनी मनात त्यांच्या खटकले असावे
पावसालाही तुझीच चिंता तू भिजावी म्हणून
सोबतीला घेऊन वादळ वारे परतले असावे
तो थेंबही आसुसलेला सदा तुला भेटण्याला
शिंपल्यानेही आपुले डोळे मिटवले असावे
पाहुनी उजेड काजव्यांनी शर्थ थांबविली खरी
ज्योतीत भिरभीऱ्याचे प्राण अडकले असावे
त्या पाऊलखुणा मिटल्या आज लाटेने साऱ्या
शब्दांचे वादळ हृदयी तुझ्या धडकले असावे
तुझ्यातून जीवन जगताना न व्हावी दूर तू
अंतरातील या भीतीने अश्रू बरसले असावे
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२