डोईवर डोले रे पीक
तसा राबे माह्या बाप || धृ ||
करी शेतात तो काम
वाहे घामाच्या रे धारा
मुखी विठ्ठलाचे नाम
चाले संसार रे सारा
सर्जासंगे लागे रे धाप
तसा राबे माह्या बाप || १ ||
रुते मातीत बियाणं
सैल बैलाचा कासरा
येता गोठ्यात ही गाय
बिलगे अंगी रे वासरा
पाठीवर पडे रे थाप
तसा राबे माह्या बाप || २ ||
आले उन्हाला उधाण
चढे माथ्यावर पारा
डोळ्या मध्ये हे सपान
पडो चोचीत रे चारा
मनी सुटे रे थरकाप
तसा राबे माह्या बाप || ३ ||
दोन मुठा आवळून
बांधे डोक्यावर भारा
नाचे वाऱ्यावर मन
फेडू शेताचा रे सारा
भुईवर पडे रे छाप
तसा राबे माह्या बाप || ४ ||
आले दाटून हे ढग
वाहे गरागरा वारा
झाले आडवे हे पीक
संगे पाण्याच्या रे धारा
नशीबी या कसा रे शाप
तसा राबे माह्या बाप || ५ ||
आलं हातात हे पीक
अडवे व्यापारी रे बारा
पैका नाही रे समीप
चाले बोलीचा पसारा
रासीवर लागे रे माप
तसा राबे माह्या बाप || ६ ||
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२