"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

अष्टाक्षरी तंत्र

थोडे अष्टाक्षरी या छंदाविषयी

 *अष्टाक्षरी* *तंत्र* *आणि* *मंत्र* 


मित्रहो आज 'सृजन अष्टाक्षरी' या उपक्रमाचा पहिला दिवस आहे. अनेक मान्यवरांनी यात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. अष्टाक्षरी कशी लिहावी याविषयी अनेक मत-मतांतरे आहेत.
या छंदाविषयी थोड्या माझ्या आकलनातील गोष्टी आपणा सर्वांसाठी देत आहे. कदाचित आपल्याला आपल्या नकळत या गोष्टी अवगत झाल्या असतील. पण तरीही छंदशास्त्र अष्टाक्षरी विषयी काय म्हणते ते आपण पाहू.

 *अष्टाक्षरी* *तंत्र* 


१. अष्टाक्षरी मध्ये प्रत्येकी आठ अक्षरे असलेल्या चार चरणांचे एक कडवे असते.
२. प्रत्येक दोन अक्षरांवर यती येतो
३.  अष्टाक्षरी ची सुरुवात समसंख्या असलेल्या शब्दांनी सुरू  व्हायला हवी. कारण अष्टाक्षरी हा गेय काव्यप्रकार आहे आणि गेयता साधण्यासाठी द्वीअक्षरी शब्द चपखल असतात.
४. अष्टाक्षरी मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये शेवटी यमक साधला जावा.

 *अष्टाक्षरीचा मंत्र* 

५. पहिल्या दोन ओळी एका सूत्रात बांधलेल्या असतात. तिसर्‍या आणि चौथ्या ओळीत पहिल्या दोन ओळीतील आशयाशी सलगता राखण्यासाठी एखाद्या उदाहरणाने पूर्णत्व आलेले असते.


उदाहरणादाखल बहिणाबाईंची कविता घेऊन पाहू

मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.

मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे लाटा.

 *तंत्र* 

पहिल्या आणि चौथ्या चरणात यमक सातला आहे.पहिल्या तीन ओळी दोनअक्षरी शब्दांनी सुरू झाल्या आहेत. शेवटची ओळ सहा अक्षरी शब्दाने सुरू होते. म्हणजे पहिला शब्द सम संख्येचा आहे.

मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.

 *तंत्र* 

यात दुसऱ्या आणि चौथ्या चरणात शेवटी यमक साधला आहे.
प्रत्येक चरणाची सुरुवात सम अक्षरांनी झालेली आहे

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !

 *मंत्र* 

पहिल्या दोन ओळीत मन कसे विषारी आहे हे सांगितले आहे
शेवटच्या दोन ओळीत मन विंचु आणि साप यांच्यापेक्षाही विषारी आहे सांगितले आहे कारण विंचु आणि साप यांच्या विषाला उतारा असतो . मनातील विषाला उतारा नाही.



मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.


 *मंत्र* 

पहिल्या दोन ओळीत बहिणाबाईंनी म्हणाला पाखराचे उपमा दिली आहे.
शेवटच्या दोन ओळीत मन जर पाखरू असेल तर ते या क्षणाला जमिनीवर असेल तर दुसर्‍या क्षणाला आभाळात जाते हा त्याचा चंचलतेचा धर्म सांगितला आहे.


उरलेल्या कल्याणमधील तंत्र आणि मंत्र आपण स्वतः जाणून घ्यावेत ही विनंती.


मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.

देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !

देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !


अष्टाक्षरी छंदातील इंदिरा संत यांची मी लहानपणी अभ्यासलेली कविता येथे देतोय.

आली बघ गाईगाई
शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध
थबकली ताटव्यात

आली बघ गाईगाई
पायी चांदण्यांचे चाळ
लावले का अवधान
ऐकावया त्यांचा ताल

आली बघ गाईगाई
काढीतसे लांब झोका
दमलीस खेळूनिया
मीट मोतियांच्या शिंपा

आली बघ गाईगाई
लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले
डोळे माझ्या सानुलीचे


यातील काही चरणांची सुरुवात जरी तीन अक्षरी शब्दांनी झाली असली तरी गाताना किंवा म्हणताना आपण त्याला जोडून पुढील एक अक्षर घेतो.

अष्टाक्षरी मध्ये आणखी खूप गमतीजमती आहेत. त्याविषयी नंतर केव्हातरी नक्की लिहीन.पण आज तूर्तास एवढेच.

आपलाच

जयसिंग गाडेकर