कधी वाटे मजला तू
नवी नवेली नवरी,
रंगवून भाषिक सप्तरंग
जशी राधा ही बावरी.
कधी वाटे मजला तू
शब्दागणिक असे दामिनी,
लचकत मुरडत यावी
जशी नखरेदार गजगामिनी
कधी वाटे मजला तू
पुणेरी अन नागपुरी
घालून अलंकारिक शालू
जशी लेक चालली सासरी
कधी वाटे मजला तू
विखुरलेला हा डाव,
मराठीचाही येईल सुवर्णयुग
मराठीही सोसेल हा घाव
कधी वाटे मजला तू
महाराष्ट्राची असशी शान,
अटकेपार मराठीचा झेंडा
मराठी माणसाचा तू अभिमान
कधी वाटे मजला तू
सूर्य चंद्र अन तारे,
दाही दिशा उजळतील
वाहतील मराठीचे वारे
कधी वाटे मजला तू
भाषेहुन भाषा लई भारी,
दिशादिशातून पडघम वाजे
घ्यावी गगनात उंच भरारी
कधी वाटे मजला तू
इंद्रधनुचे रंग सात,
मराठीचे संवर्धन करूया
मराठीचे गोडवे गात
कधी वाटे मजला तू
जिव्हेची धारदार तलवार,
मराठी भाषा जागवा मनी
चिंतितो मराठी शिलेदार
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372