तुला टाळतो मी
तुझा स्पर्श होता किती भाळतो मी
तुझा भास आता सखे टाळतो मी
तसा छंद नाही मला पुस्तकांचा
जुने घाव माझे सदा चाळतो मी
कसे दुःख सांगू इथे संचिताचे
सुखाचेच अश्रू सखे गाळतो मी
किती गंध होता बरे केवड्याला
अता मोगरा रे सदा माळतो मी
नसे काम माझे जरी शेतकीचे
तरी घाम माझा इथे जाळतो मी
(जरी गझल माझी नसे ती रुबाई)
(तरी रे अलामत बरे पाळतो मी)
गझल : भुजंगप्रयात
गण: लगागा लगागा लगागा लगागा
© कमलेश सोनकुसळे