सातबारा
गाळला घाम शेतात सारा
राहिला फाटका सातबारा
लावला जीव केलीच शेती
फेडतो जीवनाचा घसारा
करपलं रान हे भोवताली
वासरांना मिळेनाच चारा
फिरवली पाठ पाऊस झेले
निर्दयी या नभाचाच पारा
दे पिकाचं अता दान देवा
पाडतो रे कसा भुवर गारा
पावसासह लपंडाव खेळे
पाठमोऱ्या मनाचाच वारा
लावला एवढा जीव आता
सावरू शेतकीचा पसारा
गझल : भामिनी
गण : गालगा गालगा गालगागा
© कमलेश सोनकुसळे