"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

द्रोण काव्य

*द्रोण काव्य*

प्रस्तावना:

          आपणा सर्वांना परिचीत असलेला अतिशय सुंदर..आकर्षक काव्य प्रकार म्हणजे द्रोण काव्य!

        आपण क्रमवार काव्य प्रकार शिकत आहोत. 

        आतापर्यंत... द्विअक्षरी, तीन अक्षरी,त्रिवेणी, प्रणू चाराक्षरी, रोही पंचाक्षरी,हायकू, षडाक्षरी,षटकोळी  मधु सिंधु, निशु शब्दिका  मधु सप्तर्षि, अष्टाक्षरी (अष्टाक्षरी काव्यप्रकार फार महत्वाचा आहे .. पुन्हा रिव्हीजन घेऊ) हे काव्यप्रकार शिकवून झाले आहेत आपले. आज आपण  द्रोण रचना शिकू.. (मागच्या वर्षी शिकविली होती.)  

      चला तर आता द्रोण काव्यप्रकाराची  सविस्तर माहिती घेऊ या.

      

🔶द्रोण काव्याचे नियम:

(आकृतीबंध- ७-६-५-४-३-२-१)


  ◼️ पहिल्या ओळीत सात वर्ण आणि त्या खाली प्रत्येक ओळीत उतरत्या क्रमाने..एक एक वर्ण कमी होत जावून शेवटच्या ओळीत फक्त एकच वर्ण असणारी ही एक २८ अक्षरांची अर्थपूर्ण.. तालबद्ध आशयात्मक मांडणी असते.

  ◼️ रचनेचा आशय विषयाशी निगडीत असावा त्यातून चांगला अर्थ निर्माण व्हावा.

  ◼️यमक जोड: पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या ओळीत यमक जुळवावे ....

  अथवा..

  ◼️ दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या ओळीत यमक जुळवावे.

  (एका काव्यात ..एकच यमक जोडणी पध्दत अवलंबावी..मस्तच तिन काव्य एका विषयावर लिहून सजावट केलेली छान वाटते..पाच सात कडव्यापर्यंत रचना करता येते.)

  नमुना:उदाहरण..


द्रोण काव्य

विषय :सत्य


शोधू अंतिम सत्य

आहे हे यथार्थ

ईश्वर सत्य

भाव सार्थ

जीवनी

अर्थ

या


उभारावे जीवन

सदा सत्यावर

एकच सत्य

तो ईश्वर

विश्वास

कर

हा


(सौ.सुधा जाधव)


  ♦️लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:

  

  ◼️द्रोण काव्यात शब्दरचना, रचनेचा अर्थ,शब्दमर्यादा, स्वर यमक आणि शब्दस्वर यमक, यास जास्त महत्त्व दिले जाते. शब्द स्वर यमक म्हणजे स्वरयमक आणि शब्दयमक.. उदा..दारी-वारी; जीथे-तीथे; करते-भरते,परी-जरी;खळा-मळा, लक्ष्य-दुर्लक्ष; सचोटी- कसोटी...वगैरे

  उदा.

  रमून-दमून

  रमून=र +म (ऊ)+न

  यात स्वरयमक ..ऊ

  (ऊकारांत)

  अंत्य यमक..न

  दोन्ही रमून- दमून ही यमकजोडणी .. दोन्ही ऊकारांत स्वर आहेत..अशी जोडणी केली कि रचना सुपर होते.

  ◼️या काव्यप्रकारात अक्षर मोजणीला फार महत्त्व आहे.म्हणून जोडाक्षरे लिहिताना काळजीपूर्वक  शब्द पहावा.

सौंदर्य..तीन वर्ण

स्पर्श.. दोन वर्ण

आश्चर्य ..तीन वर्ण

तुझ्यासाठी..चार अक्षरे

हास्यसम्राट...पाच अक्षरी

हृदयस्पर्शी..पाच अक्षरे

(तसेच..सम अक्षरी शब्द विषम अक्षरी शब्द..(विषम अक्षरी- सचोटी-कसोटी) सम अक्षरी- खेळ-मेळ) वापरून काव्य केल्यास उत्कृष्ट काव्य होते.)


रचनेसाठी सर्वांना शुभेच्छा

जास्तीत जास्त सराव करावा.


सौ.सुधा जाधव

कोल्हापूर


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁