तू गेल्यावर
(तरही गझल...)
भकास झाले हसरे अंगण तू गेल्यावर
कसेच गावे.. गाणे जीवन तू गेल्यावर
अंतरातील.. शब्द गीतांचे रितेच झाले
कसे गझलेचे.. पाळू बंधन तू गेल्यावर
नियतीचा हा खेळ मोडला अर्ध्यावरती
पुन्हा कैसे... आखू रिंगण तू गेल्यावर
गायले सदा मंजुळ गाणे तुझ्याचसाठी
कर्कश झाले.. माझे गुंजन तू गेल्यावर
कधीच नाही.. या हृदयाचे चुकले ठोके
मिनमिनते हे.. झाले स्पंदन तू गेल्यावर
बहराचा हा ऋतू खेळलो मस्त तुजसवे
नकोच आता मजला कुंदन तू गेल्यावर
होतीच आस जगण्याला रे तेव्हा जगती
नकोच आता कुठले मंथन तू गेल्यावर
अनलज्वाला : 24 मात्रा (८+८+८)
(मतल्यातील उला मिसरा प्रसिद्ध गझलकार मसूद पटेल यांच्या गझलेतुन साभार)
© कमलेश सोनकुसळे, काटोल