"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

शेतकरी बा

८/१०/२०१९ (दसरा)

शेतकरी बा

रे आज पुन्हा सोन्याचा, बाजार मांडला होता
दोन पैशासाठी बानं, हा खेळ मांडला होता

कोरडा म्हणता म्हणता, ओल्याचे सावट दिसले
दुष्काळ जाहीरासाठी बा, शासनाशी भांडला होता

नाहीच पिकले शेतात, या ओल्या दुष्काळाने
चार दाण्यासाठी बानं, हा जीव टांगला होता

शेतातलं नाही तर, धुऱ्यावरचं तरी देईल
या आशेवरच बाचा, हा डाव पांगला होता

जीवनाशी दोन हात, रोज रोज करतो बा
नशिबाच्या शत्रूशी बानं, हा फास बांधला होता

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२