"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

मनाला बोचलं म्हणून

मनाला बोचलं म्हणून

दोनचे चार हात झाले म्हणून, मायला काढलं बाहेर
यासाठी केला काय रे, तिनं देवासमोर आहेर
तू लहान असताना, उपाशीपोटी भरवलं तुझं पोट
घामाभरल्या अंगानं, तिच्यासाठी चहाचा घोट

ती अडाणी होती म्हणून, सर केला दुःखाचा डोंगर
तिच्या कृपेनं सुखी झाला अन् तिलाच केलं बेघर
तुझ्या आनंदासाठी तिनं साखर वाटली गावभर
कर तिच्यासाठी काही तरी, दगडाला फोड पाझर

पोरगं शिकावं म्हणून, दिवसरात्र राब राब राबली
तुझ्या भविष्याचा विचार करून, अर्धी भाकर खाल्ली
कशाला करतो चार धाम अन् जातो पंढरपूर काशी
तिन्ही जग फिर तू, तरी स्वर्ग तिच्या पायापाशी

तू सुखी व्हावं म्हणून, तिनं नवस केले हजार
सूर्यास्ताच्या तिच्या जीवाला, का करतोस बेजार
दुनियेच्या मायाजालमध्ये, असा होऊ नको लाचार
दे तिला दोन घास खायला, असा मांडू नको बाजार


ती साधी होती म्हणून, नियतीने चारदा केले वार
क्रूर नियतीही तिच्यासमोर, झाली होती बेजार
इमानदारीनं जगली अन् इमानदारीनं जगणं शिकवलं
अरे, तुझ्यासाठी तिनं, रक्ताचं पाणी पाणी केलं

मोठा साहेब झाला म्हणून, तू सुखानं खा तुपाशी
तिच्या पोटचा गोळा तू, तिला ठेऊ नको उपाशी
टाक तिच्या ताटात, चतकोर शिळी भाकर
जीवाचं रान करून तुला, केला सरकारी नोकर

तुला जन्म दिला म्हणून, घे तिला घरात जरा
घरात घेतल्यावर, होऊ नकोस कावरा बावरा
झाडावरचं पिकलं पान, जगेल तरी किती ?
जगली आयुष्य तुझ्यासाठी, तिची करू नको माती

© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२