"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

२३ मे २०२३

उलगडा

 उलगडा


शब्दाने माजवले काहूर.. या देहात बाटल्यावर

उलगडले अस्तित्व.. मरणाने 'ना' म्हटल्यावर


या झोपडीत ओसांडतो.. आनंद किरणासंगे

का मोडावा अर्धा डाव.. हा संसार थाटल्यावर


वादळ शमले कधीचे.. तरी मनी उसंत नाही

झाला मनाचा कोंडमारा.. हे हृदय दाटल्यावर


उडण्याची उर्मी भारी.. या निळ्याशार गगनी

पक्ष्यांनी थांबविली शर्थ.. हे पंख छाटल्यावर


पिल्ले मुसमुसले अन्.. झाल्यात वेगळ्या वाटा

हुंदका झाला रे कोरडा.. हा पान्हा आटल्यावर


मी पुरता संपवा म्हणून.. झालेत वार कैक

किती टाचावे नाते.. हे आभाळ फाटल्यावर


आशाही हवेत विरल्या.. स्वप्नेही झालीत बेरंगी

भेटूया पुढच्या जन्मी... या मनात वाटल्यावर


© कमलेश सोनकुसळे

७५८८६९१३७२

०७ मे २०२३

ठराव

 ठराव


दुःख झेलण्या मज आता सराव पाहिजे

स्वप्न बघण्यास कश्याला ठराव पाहिजे


आनंदाने जगण्याची केली चेष्टा जरा मी 

मैत्रीने जगावयाचा मनी भराव पाहिजे


खेळ खेळून झाले कैक जीवन मरणाचे 

मरणाला मिठीत घेण्या इथे हाव पाहिजे


असू दे अंगावर कितीही फाटके कपडे

सलाम ठोकण्या ज्ञानाचा पेहराव पाहिजे


जीवन जगून झाले अन् हरलो जरी मी 

अर्ध्यावरती जिंकण्या इथे डाव पाहिजे


हरवलो जरी काळोख्या रात्री कैकदा मी 

तुझ्या आठवणींचा समोर गाव पाहिजे


रंग लाव तुला हवा तेथे कुठल्याही क्षणी 

हृदय रंगण्या आधी त्याला घाव पाहिजे


तू कष्ट कर आणि पिकव शेती कितीही 

शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव पाहिजे


उलगडले शब्द लिहिण्या लेखणीला जरी 

कागदावर चालण्या तिला ठाव पाहिजे


© कमलेश सोनकुसळे, काटोल