"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

१२ मार्च २०२०

बंदीस्त नाती

बंदीस्त नाती

पिकले पान ते, वाळले कधीचे
नियम जगाचे, पाळले कधीचे

सुगंध नात्यांचा, मनी दरवळे
गजऱ्यात फुले, माळले कधीचे

नियतीने केली, थट्टा जगण्याची
हृदयी असावे, ढाळले कधीचे

वार पाठीवरी, अकस्मात झाला
शब्द अंतरीचे, जाळले कधीचे

ते व्रण आजही, खुणावी नयनी
स्वप्न भविष्याचे, गाळले कधीचे

ती बंदीस्त नाती, वाचण्या चुकलो
जखमांचे पान, चाळले कधीचे

आठवांची व्यथा, सातजन्मी मिळे
संचिताचे डाव, भाळले कधीचे

श्वासात गुंतली, अदृश्य लेखणी
अक्षरांचे लोंढे, टाळले कधीचे

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372


अंतरीचे तरंग

अंतरीचे तरंग

आनंद घेऊन आला, धुडवळीचा रंग
राधा सवे कान्हा, वाहे अंतरीचे तरंग

मनातून भेद काही, मिटता मिटेना
जगण्याचा होता तो, वेगळाच ढंग

तो धनी होता म्हणून, जगला जरासा
पिकानेही पुसली पाने, वदनही बेरंग

मातीने गायिले गोडवे इथे हिरव्या धरेचे
फुलांनी सोडला ना कधी काट्यांचा संग

जीवनाला उत्तर देण्या, सरसावली तीही
कधी मिळे ज्वाला, कधी चुरगाळले अंग

अवशेष न सापडले, कधी कर्तृत्वाचे
स्वप्नही वेशिवरती आता, जहाले भंग

मनामनात जागवली, लकेर मराठीची
तरी कळेना का लागला भाषेला सुरंग

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल 7588691372